नांदेड - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा स्वतःचा सुरक्षित मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाकडे पाहिले जाते. त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. गेल्यावेळी या मतदारसंघातून त्यांना जवळपास २२ हजार मतांचे मताधिक्क्य होते. मात्र, यावेळी केवळ ५ हजाराच्यामध्येच मताधिक्क्य मिळाले. आमदार यांच्या नाराजीचाच हा फटका असल्याचे बोलले जात आहे. तसेच नांदेड-दक्षिण, उत्तर आणि नायगाव मतदारसंघानाही अपेक्षीत अशी मतांची आघाडी मिळाली नाही. हक्काच्या समजल्या जाणाऱ्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
भोकर मतदारसंघात यावेळी कधी नव्हे ते विद्यमान आमदार अमिता चव्हाण यांच्याबद्दल जनतेची नाराजी होती. आमदार म्हणून त्यांनी जनतेची कामे केली नसल्याची खंत यावेळी अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी व्यक्त केली. याच नाराजीचा फटका काँग्रेसला बसला असून २३ हजारावरील मताधिक्क्य केवळ ५ हजारावर येऊन ठेपले आहे. हीच परिस्थिती नांदेड दक्षिणमध्येही झाली, तर आमदार डी. पी. सावंत यांच्या मतदारसंघातून मात्र तीस हजारांचे मताधिक्क्य मिळून काँग्रेसच्या आमदाराने लाज राखली. मात्र, त्याठिकाणीही १३ हजार मतांनी मताधिक्क्य घटले.
दुसरीकडे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना मात्र मुखेडने गतवेळेस पेक्षा खंबीर साथ दिली. जवळपास ३५ हजारांचे मताधिक्क्य दिले. देगलूर मतदारसंघानेही गेल्यावेळी काँग्रेसला ३ हजारांचे मताधिक्क्य दिले होते. यावेळी मात्र भाजपला २० हजारांचे मताधिक्क्य मिळाले. तसेच नायगाव मतदारसंघातूनही भाजपला एकवीस हजारांचे मताधिक्क्य दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीने या सर्व मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मते घेतल्यामुळे काँग्रेसला फटका बसला. काँग्रेसच्या जिल्हास्तरावरील आणि मोठ्या समजल्या जाणाऱ्या नेत्यांच्या गावातच काँग्रेसची पीछेहाट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
२०१४ च्या निवडणुकीत उमेदवारांना पडलेली मते -
- अशोक चव्हाण (काँग्रेस) - ४९३०७५
- डी. बी. पाटील (भाजप) - ४११६२०
- विधानसभा पक्ष मताधिक्य
- भोकर काँग्रेस - २३ हजार १९९
- उत्तर नांदेड काँग्रेस - ४३ हजार १५४
- दक्षिण नांदेड काँग्रेस - २७ हजार ०९६
- नायगाव भाजप - ३ हजार ८४६
- देगलूर काँग्रेस - २ हजार ३३७
- मुखेड भाजप - ११ हजार १०२
२०१९ च्या निवडणुकीत उमेदवारांना पडलेली मते
- अशोक चव्हाण (काँग्रेस) - ४४६४५८
- प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) - ४८६८०६
- विधानसभा पक्ष मताधिक्य
- भोकर काँग्रेस - ४ हजार ७८६
- उत्तर नांदेड काँग्रेस - ३० हजार ११७
- दक्षिण नांदेड काँग्रेस - ४ हजार ८६४
- नायगाव भाजप - २० हजार ६४१
- देगलूर भाजप - २३ हजार ३०९
- मुखेड भाजप - ३५ हजार ८२७