नांदेड - आर्थिक फायद्यासाठी रुग्णांची पळवापळवी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्ण पळवल्याच्या संशयावरून एका कंपाऊंडरला मारहाण झाली आहे. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या डॉक्टर विरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
शहरातील नामांकित डॉक्टर कत्रूवार यांनी एका रुग्णाला एम. आर. आयसाठी भगवती या डायग्नोस्टिककडे रेफर केले होते. मात्र, तो रुग्ण तिथे न जाता आपल्या सोईच्या भक्ती डायग्नोस्टिक मधून एम.आर.आय रिपोर्ट घेऊन आला. डॉ. कत्रूवार यांनी रुग्णाचा रिपोर्ट बघितला आणि त्यांना संताप अनावर झाला. त्यावेळी भगवती डायग्नोस्टिकचे डॉक्टर अजित शिंदे यांना जाब विचारला. मात्र, डॉ. अजित शिंदे यांनी भक्ती डायगोस्टिकचा फिर्यादी कंपाऊंडर राठोडला बोलवून आमचा रुग्ण का तपासला? असा जाब विचारात त्याला मारहाण केली. दीपक राठोड याच्या पायाला जबर मार लागला आहे.
नांदेडमध्ये डॉक्टर लाईन आहे. अनेक मल्टी स्पेशालिटी दवाखाने आहेत. मोठ्या शत्रक्रिया देखील नांदेडात पार पाडतात. नांदेडसह बाहेर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रुग्ण इलाजासाठी नांदेडात येतात. मात्र, येथील डॉक्टरांकडून त्यांचा इलाज करण्याऐवजी आर्थिक लूट केली जात आहे.
असे गंभीर प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे आहे.