नांदेड : 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी जाहीर सभेला संबोधन करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जगभर होत आहे. विरोधक त्यांना विरोध करण्यासाठी बैठका घेत आहेत. मात्र त्यांच्या बैठकीचे आम्हाला काही घेणे देणे नाही. सरकारवर होणाऱ्या आरोपांचे उत्तर आम्ही विकासाच्या माध्यमातून देऊ', असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.
'हे सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे सरकार आहे' : मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामामधील शहिदांना अभिवादन करत भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, 'हे सरकार सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे सरकार आहे. डबल इंजिन सरकारमुळे अवघ्या काही महिन्यातच राज्यातील विकास कामांना प्रचंड वेग मिळाला आहे. आम्हाला केंद्र सरकारचेही चांगले सहकार्य मिळत आहे. यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. राज्य शासनाच्या 'शासन आपल्या दारी' उपक्रमामुळे सरकारी कामे झटपट होत आहेत', असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले.
'75 हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा संकल्प' : कनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या काळात जेवढा विकास झाला नाही, तेवढा आम्ही काही महिन्यात केला. शासनाकडून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत मिळत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने 75 हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
'रखडलेले प्रकल्प पूर्ण केले जातील' : एकनाथ शिंदे यांनी यावेळी नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील विकास कामे व मार्गी लागलेल्या प्रकल्पांचा उल्लेख केला. पैनगंगा नदीवरील बंधारे रखडलेला लेंडी प्रकल्प तसेच वर्धा - यवतमाळ - नांदेड हा रखडलेला रेल्वे मार्ग पूर्ण केला जाईल, असे ते म्हणाले. यासोबत नांदेड येथील कृषी महाविद्यालयाबाबत सकारात्मक निर्णय घेवू अशी ग्वाही त्यांनी दिली. विनेगाव येथील रखडलेल्या पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लावावा अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
हेही वाचा :