नांदेड - जिल्हातील चाईल्डलाईनला एक निनावी फोन आला अन् बालसंरक्षण कक्ष आणि पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले. तो निनावी फोन होता बाल विवाहाची माहिती देणारा. यामुळे जिल्हा बालसंरक्षण कक्ष व विमानतळ पोलिसांच्या प्रयत्नामुळे एक बालविवाह थांबविण्यात यश आले आहे.
चाईल्ड लाईनने तत्परतेने ही माहिती बालकल्याण समिती सदस्य अॅड. सावित्री जोशी यांना दिली. त्यानुसार त्यांनी बालसंरक्षण कक्षास बालविवाह थांबविण्याचे आदेश दिले. महिला सहाय्य कक्षातील राधा गव्हारे, बालसंरक्षण कक्षाचे रमेश सावळे, निलेश कुलकर्णी, आशा सूर्यवंशी, प्रविण कुलकर्णी, बालाजी आलेवाड आदींनी विमानतळ पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्याचे प्रताप गर्जे व त्यांच्या चमूने कामठा गाव गाठून बालविवाह करणाच्या मुलीच्या आई-वडिलाची समजूत काढून बालविवाह कायद्याची माहिती दिली. बालवयात होणाऱ्या विवाहामुळे माता व बालमृत्यू होतात. या बाबतचे समुपदेशन करण्यात आले. तसेच १८ वर्षे वय झाल्यानंतरच मुलीचा विवाह करणार असे हमीपत्र लिहून घेतले. त्यामुळे कामठा येथे होणारा बालविवाह थांबविण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्ष व विमानतळ पोलिसांना यश मिळाले आहे.