नांदेड Chandrashekhar Bawankule On Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ( शरद पवार गट ) जितेंद्र आव्हाड यांनी एक्स हँडलवर केलेल्या पोस्टनंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांना जोरदार उत्तर दिलंय.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे : यासंदर्भात नांदेडमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "संघ आणि भाजपा नेत्यांमध्ये कुठलीही बैठक झालेली नाही. जितेंद्र आव्हाड हे स्टंटबाज असून ते माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी रोज काहीतरी नवीन करतात. तसंच भाजपा ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महायुती सोबतच लढणार आहे" असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले : एक्स हँडलवर केलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, "नागपूरमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक वैचारिक बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झालं. या मंथनातून राज्यात भाजपाने एकट्यानं निवडणूक लढवावी, असं ठरवण्यात आलं. तसंच ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांच्यावर डाग आहेत, त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना राजकारणाची जाण आहे त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजपा एकटीच लढेल. ज्यांना भाजपासोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढं काय होईल, हे सांगता येत नाही."
नाना पटोलेंच्या टीकेवरही दिली प्रतिक्रिया : भाजपाला आरक्षण द्यायचं नाहीये तर जाती-जातीत तेढ निर्माण करून आरक्षण संपवायचं, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. या प्रत्युत्तर देत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "काँग्रेस पार्टीला आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाहीयं. जाती-धर्मात तेढ निर्माण करुन जनतेत यांनी संभ्रम निर्माण केलाय. 65 वर्षात कोणत्याही समजाला काँग्रेसनं न्याय दिला नाही. त्यांनी केवळ मतांच्या राजकारणासाठी जनतेला संभ्रमित केलंय. फडणवीस सरकारनं मराठा आणि ओबीसीला न्याय दिला. मात्र, ठाकरे सरकारनं जी मांडणी करायची होती ती केली नाही. भाजपानं कधीही समाजात तेढ निर्माण केले नाही, म्हणूनच 3 राज्यातमधील निकाल असे आलेत. मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी काँग्रेसचे लोक असं बोलत असतात."
हेही वाचा -