नांदेड : राज्यात महाविकास आघाडी स्थापन करून आधी बनवाबनवी करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विनाकारण राजीनामा नाट्य केले. वास्तविक त्यांना कोणीही राजीनामा मागीतला नव्हता. जर राजीनामा दिलाच होता तर राष्ट्रवादीच्या अन्य नेत्याला अध्यक्षपदाची जबाबदारी का दिली नाही?, अशी जळजळीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच समाज हितासाठी काम करणाऱ्या बजरंग दलावर कारवाईची मागणी अशोक चव्हाण यांनी करू नये, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. ते आज नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.
'कंपन्या गुजरातमध्ये नेल्याचा आरोप फेटाळला' : यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारने राज्याच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी बावनकुळे यांनी कंपन्या गुजरातमध्ये नेल्याचा आरोप फेटाळून लावला. प्रसार माध्यमांद्वारे प्रकल्पं राज्यातून बाहेर गेल्याचा आरोप होत आहे. हे चुकीचे असून प्रकल्पांना मंजुरीच मिळाली नव्हती, असे ते म्हणाले.
'शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचवणार' : राज्य शासनाच्या कामांसंदर्भात बावनकुळे म्हणाले की, शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजप व शिवसेना कार्यकत्यांकडून काम केले जात आहे. जिल्ह्यातील नऊ मतदार संघात जवळपास 60 हजार घरांपर्यंत शासकीय योजनांविषयी माहिती पोहचविण्याचे काम कार्यकत्यांमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रत्येक मंडळामध्ये बुथ बैठका घेवून कमीत कमी 25 जणांचा पक्षप्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय मंडळनिहाय बैठका घेवून शासकीय योजनांविषयी माहिती सर्व सामान्य घटकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात येणार आहे. हे सर्व काम युध्द पातळीवर सुरु असून 20 मे पर्यंत संघटनेची पुर्नरचना होणार आहे.
'सामना' मधून खोटं बोललं जातं : गुजरात मधून 40 हजार मुली पळवल्याचा अग्रलेख सामना मधे लिहिण्यात आला होता. यावर चंद्रशेखर बावकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सामनाचंं काय करावं काही कळत नाही. खोटं बोलण्यासाठी सामना मधे लोक नियुक्त केली जात आहेत. भाजपा बरोबर होते तेव्हा गुजरातमध्ये किती कामे केली, किती विकास केला हे लिहिलं जायचं. आता मात्र त्यांची विचारधारा बदलली आहे. ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जावून बसले आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा :