नांदेड - नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुखेड तालुक्यातील निवळी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिचा पती संतोष माधवराव पपुलवाडसह पाच जणांवर मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बू) येथील २४ वर्षीय तरुणीचा तीन महिन्यांपूर्वी निवळी येथील संतोष माधवराव पंपूलवाड याच्याशी विवाह झाला होता. सुरुवातीला एक महिना तिला सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. मात्र, नंतर तू काळी आहेस, असा ठपका ठेवून तुला जर येथे नांदायचे असले तर, माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये आणि दोन एकर जमीन नावाने कर, अशी मागणी करत सासरच्या मंडळीनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. तिला मारहाण करण्यात येत होती. याबद्दल तिने तिच्या माहेरच्या मंडळीना सांगितल्यानतंर तिच्या वडिल तिला अंबुलगा येथे घेऊन गेले होते.
दरम्यान, पती संतोष व सासू पार्वतीबाई पपुलवाड हे माझ्या वडिलांच्या घरी आले व आमच्याविरोधात नांदेड येथे तक्रार का केली? असे म्हणात, लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. शेजारच्या लोकांनी त्यांच्या तावडीतून सुटका केली म्हणून माझे प्राण वाचले, असे तिने पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून पती संतोष, सासू पार्वतीबाई, सासरा माधव नारायणराव पपुलवाड, अंकुश माधवराव पपुलवाड, लक्ष्मण पपुलवाड सर्व रा.निवळी यांच्या विरोधात मुक्रमाबाद पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना अटकही करण्यात आली असून मुखेड न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.