नांदेड - शहरातील मध्यवस्तीत मारवाडी धर्मशाळेसमोर एका मोकाट बैलाने महिला व चिमुकल्याला जोराची धडक दिली. ही धडक येवढी जोराची होती की, ती महिला अक्षरश: उडून बाजूला पडली. दरम्यान, या घटनेने मनपाच्या गलथान कारभाराविषयी संताप व्यक्त जात आहे.
शहरातील मारवाडी धर्मशाळेसमोर कुंटुरकर कॉम्प्लेक्स असून या कॉम्प्लेक्समधील दुकान नंबर ६ मध्ये कपडे खरेदीसाठी काही महिला लहान मुलांसह गेल्या होत्या. दरम्यान, दुकानाच्या बाहेर उभे राहून कपडे पाहत असताना अचानक मोकाट बैल आला आणि त्याने चिमुकल्या बाळाला खांद्यावर घेऊन उभ्या असलेल्या महिलेला जोराची धडक दिली. या घटनेत दोन्ही मायलेक दुकानात जाऊन पडले. त्यानंतर बाजारपेठेत धावपळ उडाली, अशी माहिती नगरसेवक प्रतिनिधी अमित व सुमित मुथा यांनी दिली आहे. या प्रकाराने व्यापारी वर्ग धास्तावला असून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करुनही त्याकडे मनपा प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याने तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, मोकाट जनावरे मनपाच्या कोंडवाड्यात घेऊन जात नाहीत, अशी लेखी तक्रार काही तरुण कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्त लहुराज माळी यांच्याकडे केली. तसेच या प्रकाराचा आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी महेश देबडवार, बिरबल यादव, गौतम जैन यांच्यासह अन्य कार्यकर्ते होते.