नांदेड - पिंपळगाव महादेव (ता. अर्धापूर) येथे जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून आपल्या सख्या भावावर चाकुने वार करुन निर्घृण खून केल्याची मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी भावाविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जुन्या भांडणाचा धरला मनात राग -
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंपळगाव महादेव येथील दिगांबर अमृतराव कल्याणकर (वय ४८) यांनी मागील भांडणाच्या कारणावरुन मनात राग ठेवला होता. त्यामुळे गावातील सार्वजनिक रस्त्यावर अनिल अमृतराव कल्याणकर (वय ४५ ) याला थांबविले. मागच्या भांडणावरुन शिवीगाळ सुरु केली. एवढेच नाही तर त्याच्या पोटावर, छातीवर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडूनही करत होता मारहाण -
रक्ताच्या थारोळ्यात भाऊ पडला असनाही तो त्याला मारहाण करतच होता. या मारहाणीत अनिल कल्याणकर हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती अर्धापूर पोलिसांना मिळताच त्यांनीही रात्री घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मारेकरी दिगांबर कल्याणकर याला ताब्यात घेतले.
खूनाचा गुन्हा दाखल -
याप्रकरणी अमोल अनिल कल्याणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिगांबर अमृतराव कल्याणकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला करण्यात आला. अर्धापूर पोलिसांनी आज (बुधवार) न्यायालयासमोर हजर केले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी जी. जी. रांजनकर, पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनीही भेट देवुन घटनेची माहिती घेतली व तपासाबाबतच्या सूचना केल्या. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कपील आगलावे तपास करत आहेत.