देगलूर (नांदेड) - जिल्ह्यातील धनगरवाडी (ता.देगलूर) शिवारात सोमवारी (दि.22 जून) लचके तोडलेल्या अवस्थेत एका मुलीचा मृतदेह आढळला होता. या खून प्रकरणाचा मरखेल पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत छडा लावत बहिणीचा खून करणाऱ्या भावाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
देगलूर तालुक्यातील धनगरवाडी येथील एक अल्पवयीन मुलगी 20 जून रोजी लोणी येथील तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी धनगरवाडी शिवारात गेली होती. याच दरम्यान तिचा भाऊ अनिल सूर्यवंशी हा हणेगावहून परत आला होता. यावेळी त्याला तिची बहिण घरात नसल्याचे कळाले. तिचा शोध घेत तो शेताकडे गेला. त्यावेळी ती तिच्या प्रियकरासोबत आढळली. त्यामुळे राग अनावर झाल्याने भावाने बहिणीच्या खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात फेकून दिला. त्यामुळे जंगली हिंस्र पशुंनी मृतदेहाचे लचके तोडले होते.
सोमवारी (दि. 22 जून) दुपारी तीनच्या सुमारास धनगरवाडी शिवारात अर्धवट अवस्थेत कुजलेला एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती मरखेल पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक आदित्य लोणीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.
त्याच दिवशी संध्याकाळी मृत मुलीच्या आईने लोणी येथील भरत गायकवाडने प्रेमसंबंधातून मुलीची हत्या केली, अशी तक्रार दिली. यावरुन भरत गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, मरखेल पोलिसांनी या प्रकणाचा छडा लावत बहिणीचा प्रेम प्रकरण मान्य नसणाऱ्या सख्ख्या भावानेच खून केल्याचे उघड केले.आरोपी भावास अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 7 जणांना अटक