नांदेड - गेल्या दहा दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे नांदेड ते तामसा राष्ट्रीय राज्य मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. यामुळे हिमायतनगर, अर्धापूर, आष्टी, जवळगाव, सोनारी, भोकर या प्रमुख गावांसह अनेक गावांचा संपर्क तुटल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून नांदेड ते तामसा या राष्ट्रीय राज्य मार्गावरील रस्त्याचे काम सुरू होते. मात्र, कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून महामार्गाचे काम बंद पडले होते. यानंतर केंद्र व राज्य सरकारने नांदेड तामसा मार्गावरील पुलाचे काम त्वरित करावे, अशा सूचना दिल्या होत्या. पावसाळ्यापूर्वी या मार्गावरील पुलांचे काम करण्याच्या सूचना असूनही कंत्राटदारांनी हे काम पूर्ण न केल्याने याचे परिणाम आता या भागातील नागरिकांना भोगावे लागत आहेत. संथगतीने होणाऱ्या कामाचा फटका आता अनेक गावांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे तामसा गावाजवळील पर्यायी पूल शुक्रवारी वाहून गेल्याने नांदेड हिमायतनगर, भोकर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावकऱ्यांना तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा जाण्यास अडचण येत आहे. त्यामुळे रुग्णांचेही हाल होत आहे. असे असूनही मात्र, घटनास्थळी शासकीय अधिकारी किंवा बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी साधी भेट देखील दिली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगीतले. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.