नांदेड - गेल्या दोन दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यातील 179 ग्रामपंचायतच्या निवडणूकीसाठी मतदान झाले. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी उशिरा अंतिम निकाल हाती आला आहे. नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा भाजपाचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांच्या नेतृत्वावर ग्रामीण भागातील जनतेने विश्वास व्यक्त करीत या निवडणूकीत भाजपाला एक नंबर पक्ष असल्याचा शिक्कामोर्तब केला आहे.
या निवडणूकीत 27 ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकून दुसर्या क्रमांक पटकविला तर कॉग्रेसला 19 ग्रामपंचायतीवर समाधान माणून तिसर्या क्रमांकावर जाण्याची नामुष्की ओढावली आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाला 4 तर उध्दव ठाकरे गटाला 8 जागेवर विजय मिळाला आहे. खा.चिखलीकर यांचा बालेकिल्ला असलेल्या कंधार व लोहा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतपैकी 34 ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवून मतदारांनी चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. किनवट तालुक्यातील भाजपाचे आमदार भिमराव केराम यांच्या नेतृत्वावरही मतदारांनी विश्वास व्यक्त करुन किनवट तालुक्यातील 53 पैकी 38 ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात दिल्यामुळे किनवटमध्येही भाजपा नंबर एकवर राहिली आहे.
मुखेड तालुक्याचे आमदार तुषार राठोड यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करीत मतदारांनी मुखेड तालुक्यातील 15 पैकी 11 ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात दिल्या आहेत. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत लोहा तालुक्यातील मतदारांनी 28 पैकी 22 ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविला आहे. कंधार तालुक्यातील 16 पैकी 12 ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला असल्यामुळे चिखलीकरांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले. कंधार-लोहा तालुक्यात आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या गटाचा धुराळा उडाला असल्यामुळे आ. शिंदे यांना फार मोठा धक्का मानला जातो.
नायगांव तालुक्यात 8 पैकी 3 ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. हदगांव तालुक्यात मुख्यमंत्री शिंदे गटाला 2 ग्रामपंचायतीवर यश प्राप्त झाले आहे. बिलोली तालुक्यातील 9 पैकी 4 भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. धर्माबाद तालुक्यात 3 पैकी 2 ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व ठरले आहे. भोकार तालुक्यात 3 पैकी 1 ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आली. नांदेड तालुक्यातील 7 पैकी 3 ग्रामपंचायतवर वर्चस्व प्रस्थापित करुन भाजपा नंबर एक ठरला आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाला 1 ग्रामपंचायतीवर यश मिळविता आले. ग्रामपंचायतच्या निवडणूकीत जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच एक नंबरचा पक्ष असल्याचे ग्रामीण मतदारांनी शिक्कामोर्तब करुन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे हे विशेष!