नांदेड - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून भोकर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर भोकर येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षातील जुन्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्ता मेळाव्यात केली आहे.
भोकरमध्ये भाजपच्या प्रस्तावित आयात उमेदवारास स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपामध्ये प्रवेश करून भोकर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या भाजप प्रवेशाला आता ग्रहण लागले दिसून येत आहे. भोकर येथील स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भोकर येथे कार्यकर्ता मेळावा घेतला होता. यावेळी पदाधिकाऱ्यांनी, आयात उमेदवार आमच्यावर लादू नका अशी ठाम भूमिका घेतली आहे. उमेदवार हा पक्षातील जुना कार्यकर्ता असावा अशी मागणी केली आहे.
अशोक चव्हाणांना पराभूत करण्यासाठी मतदार संघातील संपर्कात असणारा उमेदवार असावा
नांदेड जिल्ह्यातून काँग्रेसचे समुळ उच्चाटन करायचे असेल तर भोकर विधानसभा मतदार संघातून अशोक चव्हाण यांना आगामी निवडणूकीतून पराभूत करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाचा पराभव करण्यासाठी भोकर विधानसभा मतदार संघातीलच कार्यकर्ता दररोज संपर्कात असणारा व जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या सुखा दुःखात जाणारा उमेदवार उभा करणे गरजेचे आहे. भोकर विधानसभा मतदार संघातील भूमिपुत्राचे अर्ज स्वीकारुन पक्षाच्या वतीने उमेदवाराचे सामाजिक, राजकीय आंकेक्षण करून निवडून येण्यास पात्र असणाऱ्या उमेदवारास उमेदवारी द्यावी, असा कार्यकर्त्यातून सूर दिसून आला.
कानामागून येऊन तिखट होऊ देणार नाही
लोकसभेला बाहेरच्या मतदारसंघातील उमेदवार दिला. आम्ही सहन करून निवडून आणला. पण आता भोकर मतदारसंघात सक्षम उमेदवार असताना बाहेरच्या मतदारसंघातील आयात उमेदवार स्वीकारणार नाही. जर कानामागून पक्षात येऊन स्वतःची मक्तेदारी कोणी चालवून तिखट होत असेल तर खपवून घेणार नाही. असा इशारा यावेळी माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी अप्रत्यक्षरित्या खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दिला.
भोकर येथील ओम लॉन्स या मंगल कार्यालयात अर्धापूर, मुदखेड व भोकर येथील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला या तिन्ही तालुक्यातून भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, माजी नगराध्यक्ष राम चौधरी, माजी सभापती नागनाथ घिसेवाड, भाजपा विधानसभाध्यक्ष प्रविण गायकवाड, निलेश देशमुख बारडकर, तालुकाध्यक्ष सुधाकर कदम पाटील, शंकर मुतकलवाड, गणपत पिटेवाड यांच्यासह भोकर मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.