नांदेड - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने आघाडी सरकारच्या विरोधात अर्धापूर शहरात आंदोलन करण्यात आले. भर चौकात कोंबड्यांचे खुराडे आणून त्यात कोंबडा कोंडला. ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात रास्ता रोको करत 'घर कोंबडा' हे अनोखे आंदोलन बुधवारी करण्यात आले.
हेही वाचा - राणेंचे विधान महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही - बाळासाहेब थोरात
नांदेड - नागपूर महामार्गवर एक तास रास्ता रोको करण्यात आला. ठाकरे सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रीय मंत्री नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार है! मनमानी करणाऱ्या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, बरखास्त करा...बरखास्त करा.. ठाकरे सरकार बरखास्त करा, अशी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तसेच तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती, राज्यपालांकडे भाजपच्या वतीने दडपशाहीचे आघाडी सरकार बरखास्त करा, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अँड. किशोर देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, अर्धापूर तालुका सरचिटणीस अवधूत कदम, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष जठन पाटील मुळे, जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव लंगडे, जिल्हा सरचिटणीस रामराव भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर कदम, तुळशीराम बंडाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - कायद्यापेक्षा कोणताही व्यक्ती मोठा नाही, नारायण राणेंच्या अटक प्रक्रियेवर विजय वड्डेटीवार यांची प्रतिक्रिया