नांदेड- मुदखेड नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष मुजिब अमीरुद्दीन अन्सारी जहागीरदार हे कंत्राटदाराच्या मुनिमाकडून त्रयस्थ व्यक्ती मार्फत तीन लाख बारा हजाराची लाच स्वीकारताना जेरबंद झाले होते. त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी भाजपच्यावतीने मुदखेड नगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.यावेळी भाजपच्यावतीने ही एकाधिकारशाही असून या विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
मुदखेड नगर पालिकेत अपक्ष नगराध्यक्ष मुजिब जहागीरदार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून काँग्रेसच्या हाती एक हाती सत्ता आहे. काँग्रेस नगरसेवकांचा विरोध झुगारुन आमदार अमिता चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना जहागीरदार यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश करुन घेण्यास भाग पाडले. तेव्हा पासून अमिता चव्हाण यांचा वरदहस्त असल्यामुळे हिंमत वाढून मुदखेद नगर पालिकेत भ्रष्टाचाराचा खुलेआम सुळसूळाट वाढला होता.
या संदर्भात अमिता चव्हाण व अशोक चव्हाण यांना माहिती असून देखील त्यांनी जहागीरदार यांना सत्तेचे कुरण समजून पाठीशी घालण्याचा चंग बांधला होता. परंतु मुजिब जहागीरदार अखेर लाच स्वीकारताना जेरबंद झालेच. यानंतरही काँग्रेस नेतृत्वाने मुजिब जहागीरदार यांच्या विरोधात काहीच पावले उचलली नाहीत. म्हणुन मुदखेड शहर भाजपकडून बुधवारी नगर पालिकेच्या कार्यालयापुढे जाऊन निदर्शने करण्यात आली.
भाजपचे भोकर विधानसभा अध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी अमिता चव्हाण व अशोक चव्हाण यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे मुदखेड नगर पालिकेत भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप यावेळी केला. तसेच नगर पालिकेत बहुमताने असलेली काँग्रेस नगराध्यक्षाने केलेल्या कृत्याबद्दल गप्प का? असा सवालही गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधी घोषणांनी नगर पालिकेचा परिसर दणाणून टाकला होता. यावेळी शहराध्यक्ष संजय सोनटक्के, शिवसेना शहर प्रमुख अविनाश झमकडे तसेच आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.