नांदेड - परभणी जिल्ह्यात तब्बल हजार कोंबड्यांचा बर्ड फ्लू आजाराने मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता नांदेडात देखील कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डीत शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे कुक्कुट पालन करणाऱ्या व्यापऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कुक्कुट पालकांमध्ये चिंता -
राज्यभरात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग हळूहळू पसरत आहे. आता नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातही हा संसर्ग पसरत असल्याची शक्यता आहे. मौजे चिंचोर्डी येथील अनेक नागरिकांच्या कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. चिंचोर्डी येथील तुकाराम माधव झिंगरे २५, भारत रामजी झाडे ५६, नागोराव गोमाजी ढोले यांच्या ३० कोंबड्या आठ दिवसात अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे हा आजार बर्ड फ्ल्यूच असल्याचा संशय व्यक्त होत आहे. कोंबडी पालन करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मधमाश्यांचा देखील मृत्यू -
सोमवारी सकाळी हिमायतनगर शहरात मधमाश्याही मृत्यूमुखी पडल्याचे चित्र रुख्मिणी नगर परिसरात पहावयास मिळाले. यामागे बार्डफ्लूचा संसर्ग असल्याची चर्चा आहे. संबंधित पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बर्ड फ्ल्यूचा धोका शहर व ग्रामीण भागात पसरणार नाही याबाबत दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
मृत्यूंचे कारण काय?
पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिंचोर्डी गावातील मृत कोंबड्यांची आणि मधमाश्यांची तपासणी करावी. कोंबड्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. जर हा बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाचा परिणाम असेल तर त्याचा आणखी धोका होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.
वैद्यकीय अहवालानंतर पुढची कारवाई -
कोंबड्या अचानक मृत पावल्याने हिमायतनगर तालुक्यात चिंता वाढली आहे. या मृत्यू मागे बर्डफ्लू आहे की आणखी कोणता आजार आहे, हे वैद्यकीय तपासणीनंतर समोर येणार आहे. मेलेल्या पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. लवकरच त्याचा अहवाल येईल आणि पुढची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तालुका पशु संवर्धन अधिकारी डॉ. उमेश सोनटक्के यांनी दिली.