नांदेड - जिल्ह्यातील हदगाव शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला आहे. हदगाव मध्ये तहसील तथा बांधकाम विभागाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याचबरोबर हदगांव शहरातील विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीमुळे हदगांव शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. हदगांवला दिलेल्या या निधीमुळे आमदार माधवराव पाटील यांनी मंत्री चव्हाण यांचा जाहीर सत्कार करत आभार मानले आहेत. दरम्यान, येत्या काळात हदगाव नगरपरिषदेची निवडणूक असून काँग्रेस या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे.
हदगाव शहरातील विविध विकास कामाचे भूमिपूजन!
हदगाव शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयाच्या व जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर हदगाव शहरात नव्याने झालेल्या सुमन गार्डन व लॉन्सच्या शुभारंभानंतर त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
![शहरातील विकासासाठी कोट्यवधीचा निधी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ned-02-hadgaonnagarparishad-foto-rtu-mh10059_02092021191515_0209f_1630590315_559.jpg)
सर्व कामाचे श्रेय अशोक चव्हाण यांना - आमदार जवळगावकर
शहरासह ग्रामीण भागातील वाडी, तांड्यासह जमेल त्या गावामध्ये आपण जी काही विकास कामे केली. नागरिकांच्या कामांची सोडवणूक आजपर्यंत करू शकत आलो आणि यापुढेही करणार ते फक्त आणि फक्त माझे व महाराष्ट्राचे नेते अशोक चव्हाण यांच्यामुळेच. हदगाव शहरातील जलशुद्धीकरण, शॉपिंग कॉम्प्लेक्स, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार व तालुक्यातील रस्त्यांची व इतर विकासकामे झाली आणि होत आहेत. याबाबत आमदार माधवराव जवळगावकरांनी अशोक चव्हाण यांना सर्व श्रेय दिले.