नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Former Chief Minister Ashok Chavan ) यांनी आज एका पाखराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत त्यांच्या राजकीय वारसदाराची जणू घोषणाच केली आहे. त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे धाकटी कन्या श्रीजया त्यांचा लोकसेवेचा वारसा चालवेल ( Srijaya carry on legacy of public service ), हे आता स्पष्ट झाले आहे. भारत जोडो यात्रेला आज नांदेडमध्ये पुन्हा सुरूवात झाली आहे.
काय केले अशोक चव्हाणांनी ट्वीट : अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया मंगळवारी सकाळी भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. चालता-चालता तिने राहुल गांधी यांच्यासमवेत चर्चाही केली. त्यांच्या या भेटीचा व्हीडीओ वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर सायंकाळी अशोक चव्हाण यांनी एक ट्वीट करून श्रीजयाच्या राजकीय पदार्पणावर जणू शिक्कामोर्तबच केले. आपल्या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, पिल्लांच्या पंखात जेव्हा बळ येते, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात, तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच रहात असणार. या ट्वीटमधील पाखराच्या पिल्लाने आभाळात झेप घेण्याचा संदर्भ श्रीजयाच्या राजकीय प्रवेशाची घोषणा असल्याचे स्पष्ट आहे.
श्रीजया सांभाळते वडिलांच्या बॅक ऑफिसची जबाबदारी : मागील अनेक महिन्यांपासून श्रीजया अशोक चव्हाण यांच्या राजकारणातील पदार्पणाची चर्चा सुरू होती. कायद्याची पदवी संपादन केलेली श्रीजया गेल्या काही काळापासून वडिलांच्या बॅक ऑफिसची जबाबदारी सांभाळते आहे. अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमांचे नियोजन, जनसंपर्क आदी बाबींवर ती लक्ष ठेवते. मात्र, आजपर्यंत निवडणूक प्रचार वगळता तिने स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले होते.
श्रीजया चव्हाण यांचा भारत जोडो यात्रेत सहभाग : भारत जोडो यात्रा जाहीर झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील आयोजनामध्ये त्या सक्रिय झाल्या होत्या. यात्रेच्या स्वागतार्थ झळकलेल्या जाहिराती व फलकांमध्येही त्यांची छायाचित्रे होती. सहाजिकच भारत जोडो यात्रेतून त्यांचा राजकारणातील प्रवेश होणार असल्याचे बोलले जात होते व ती चर्चा आज अशोक चव्हाण यांच्या ट्वीटमुळे खरी ठरली आहे.