नांदेड - शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणीसाठी प्रति हेक्टर 25 हजार रूपये बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे. तसेच कोरोनाचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांना बी, बियाणे व खते कृषी विभागाच्या माध्यमातून थेट बांधावर उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
अतिवृष्टीमुळे मागच्या वर्षी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बीसाठी तर जिल्ह्यात पीकविमा भरून घेण्यासाठी कंपनीच पुढे न आल्याने विमा मिळण्याचीही शक्यता नाही. राज्य शासनाने या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना बिनव्याजी 25 हजार रुपये प्रति हेक्टर कर्ज तत्काळ उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी त्यांनी केली.
खते, बी, बियाणांची विक्री सुरु झाल्यानंतर दरवर्षीचा अनुभव पाहता कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होऊ शकते. गर्दीमुळे शेतकऱ्यांना कोरोना विषाणूचा धोका आहे. हे सर्व टाळण्यासाठी शेतकऱ्यांना थेट बांधावर कृषी विभागाच्या माध्यमातून खते, बी- बियाणे उपलब्ध करून द्यावी, असेही ते म्हणाले. खरीप हंगामाच्या पेरणीला अजून १ महिन्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे. यासाठी वेळीच योग्य पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी भागवत देवसरकर यांनी केली आहे.