नांदेड - आधुनिकीकरणाच्या काळात लग्नसमारंभात मोठे बदल झाले आहेत. त्या बदलांतही अनेक जण आपली परंपरा जपण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. असाच प्रयत्न अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील शेतकरी कुटुंबीयाने केला ( Shankarrao Barse son sushil marriage procession in bullock cart ) आहे. अख्ख वऱ्हाड हे बैलगाडीतून प्रवास करवून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्या वधूला लग्नमंडपातून सजविलेल्या बैलगाडीतून आपल्या घरी नेले. जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे.
वधूलाही घेऊन गेले बैलगाडीतून
वधूची पाठवणी शक्यतो वाहनातून होते. अनेक जण लाडक्या वधूला आपल्या घरी नेण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना शोधून काढतात. नववधूला कोणी बुलेटवरून, कोणी कारमधून, तर अगदी हेलिकॉप्टरमधूनही लग्न मंडपातून आपल्या घरापर्यंत नेल्याची उदाहरणे आहेत. पण, बारसगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरराव शामराव बारसे यांचा मुलगा सुशिल यांचा विवाह सोहळा शिवकन्या माधवराव भालेराव हिच्याशी येमशटवाडी येथे आपली रूढी परंपरा जपत पार पडला. लग्नासाठी अख्ख वऱ्हाड हे बैलगाडीतून आले. वधूला सजविलेल्या बैलगाडीतून सुमारे दहा कि.मी. चा प्रवास करत आपल्या घरी घेऊन गेले.
इंधनाची बचत आणि पर्यावरणाचे संवर्धन
जुन्या काळात वऱ्हाडी हे बैलगाडीने प्रवास केल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळे इंधनाची बचत तर होतच होती. त्यासोबत पर्यावरणाचे संवर्धन व्हायचे. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून बारसगाव येथील बारसे कुटुंबीयातील वऱ्हाडीही बैलगाडीने आले होते. तसेच, नवरदेव आणि नवरीलाही बैलगाडीने घेऊन गेले. लग्नात पारंपरिक वाद्याचा वापरही केला.
अनेकांनी मोबाईलच्या टिपली कमेऱ्यात आठवण
बारसे यांच्या कुटुंबीयांचा विवाह एमशेटवाडी येथील माधव भालेराव यांची कन्या शिवकन्या हिच्याबरोबर पार पडला. त्यांनी वधूला आपल्या घरी नेण्यासाठी आलिशान गाडीची निवड न करता आपले वडील शेतकरी असल्याचा अभिमान बाळगत बैलगाडीची निवड केली. सायंकाळी पाच वाजता सजविलेल्या बैलगाडीत वधूला आलिशान खुर्चीत बसवून स्वतः बैलांचा कासरा हातात धरत सर्जा-राजाच्या साक्षीने एमशेटवाडी ते बारसगाव असा १० कि.मी. चा प्रवास केला. या वधू - वरांचे अनेकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. अनेकांनी हे क्षण शुटिंग करत मोबाईलच्या कॅमेरात टिपले.
तीनही भावंडांचा हुंडा न घेता पार पडला विवाह
उमाकांत बारसे यांचा २०१९ मध्ये विवाह झाला. सोनाजी बारसे यांचा २०२० मध्ये विवाह झाला आणि आता तिसऱ्या मुलाचाही विवाह हुंडा न घेता संपन्न झाला असून, हुंडा घेण्याच्या पद्धतीला या कुटुंबीयांनी मोडीत काढले असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, पं.स. अर्धापूर उपसभापती अशोक कपाटे, शिवाजीराव बारसे, सरपंच मनीषा गजानन खंडागळे, उपसरपंच सरिता बालाजी गोदरे, शिवराज बारसे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - महावितरण विभागाचा भोंगळ कारभार; अनेक दिवसांपासून विद्युत खांब कोलमडून पडल्याने शेतकरी त्रस्त