नांदेड - महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने राज्यातील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर केले. सेंद्रिय शेतीसाठीचा कृषिभूषण 2019 हा या पुरस्कारासाठी मालेगाव येथील सेंद्रिय व योगिक शेती करणारे भगवान इंगोले यांची निवड झाली आहे. रासायनिक खते व औषधांचा वापर न करता शेतीला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या निविष्ठा आपल्याच शेतावर करून चांगले उत्पादन काढता येते ही भगवान इंगोले यांनी सिद्ध केले. त्यांच्या या कार्याची शासनाने दखल घेऊन सेंद्रिय शेतीचा कृषिभूषण पुरस्कार जाहीर केल्याने शेतकरी वर्गातून त्यांचे स्वागत होत आहे तसेच धामदरी येथील युवा शेतकरी दत्तात्रय कदम यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
2018-19 सालचे पुरस्कार
गेल्या दोन वर्षा पासून प्रलंबित असलेले 2018-2019 सालचे शेतकऱ्यांचे पुरस्कार कृषी विभागाने जाहीर केले. अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या कृषिभूषण सेंद्रिय शेती पुरस्कारासाठी मालेगाव (ता.अर्धापूर) येथील सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते भगवान इंगोले यांची निवड झाली.
इंगोले अनेक वर्षापासून करत आहेत सेंद्रीय शेती
गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खते व औषधांचा वापर पूर्णपणे बंद करून भगवान इंगोले यांनी आपल्या शेतालाच एक प्रकारची प्रयोगशाळा तयार केली. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारचे निविष्ठा, औषधी, बियाणे, खते तयार करून चांगले उत्पादन काढले व शेतीचा पोतही सुधारला, शेती व नागरिकांच्या आरोग्यासाठी विषमुक्त अन्न ही काळाची गरज आहे याबाबत भगवान इंगोले यांनी केलेला प्रचार व प्रसारही वाखाण्याजोगे असल्यानेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांची कृषी भूषण पुरस्कारासाठी निवड केली.
दत्तात्रय कदम यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार
तसेच धामदरी येथील युवा शेतकरी दत्तात्रय नामदेव कदम यांची वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड झाली त्यांचेही सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
हेही वाचा - नांदेडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी