नांदेड - तीन अज्ञात दरोडेखोरांनी बंदूक आणि खंजिरीचा धाक दाखवत मुदखेड शहरातील सुभाष गंज मोढा भागात असलेल्या ज्वेलरीचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. प्रसाद ज्वेलर्सचे असे या दुकानाचे नाव आहे. यात ज्वेलर्सचे मालक राघवेंद्र पवितवार यांना गंभीर दुखापत झाली आहे.
जिल्ह्यातील मुदखेड येथे तीन दरोडेखोर हे दुचाकीवर सुभाष गंज मोढा भागात आले होते. येथील प्रसाद ज्वेलर्सचे मालक राघवेंद्र पवितवार हे आपली ज्वेलर्स दुकान बंद करून सोन्या-चांदीची आणि पैशाची बॅगसोबत घेऊन दुकानाबाहेर आले. यावेळी अचानक या तीन दरोडेखोरांनी पवितवार यांना बंदुकीचा धाक दाखवला. तसेच पवितवार यांच्याकडे असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करत त्यांना खाली पाडले. इतकेच नव्हे तर त्यांना बंदूक दाखवून मारहाण केली.
त्याच क्षणी आजूबाजूच्या दुकानदारांनी पवितवार यांना कोणीतरी मारहाण करत आहे, असे पाहताच इकडे धाव घेतली. यामुळे दरोडेखोरांनी पवितवार यांना सोडून तिथून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक सुनील निकाळजेंनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरुन बंदुकीची एक मॅगझिन जप्त करण्यात आली.
हेही वाचा - मुलाचे तोंड पाहण्याआधीच आलं वीरमरण, जवान सूरज लामजे अपघातात हुतात्मा
ज्वेलर्स व्यापारी राघवेंद्र पवितवार यांना दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी मुदखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, जास्त दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले आहे. मुदखेड शहरात दिवसाढवळ्या बंदुकधारी दरोडेखोरांनी सराफा बाजारात घसून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूच्या व्यापाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला आहे. दुकानात सीसीटीव्ही फुटेज पाहून दरोडेखोरांना शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे. दरम्यान, अशा प्रकारची शहरातील ही पहिलीच घटना आहे. घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.