नांदेड - राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघामध्ये रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने भोकर शहरात अशोक चव्हाणांनी रॅली काढली. या रॅलीला भोकर मतदारसंघातील मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला.
या रॅलीमुळे भोकर विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. भोकर शहरातून ढोल ताश्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीसह प्रचंड घोषणाबाजी केली. या रॅलीच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांनी जनतेला अभिवादन केले. या रॅलीमध्ये आमदार अमिता चव्हाण, आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ : भाजपची विजयी घोडदौड विरोधक रोखणार का ?
नांदेड मतदारसंघ हा अशोक चव्हाणांचा गड म्हणून ओळखला जातो. पण, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चव्हाणांना या मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे भोकर मतदारसंघात चव्हाणांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आगामी काळात मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार, हे विधानसभा निवडणूकीनंतर समोर येईल.
हेही वाचा - नांदेडमध्ये गोवा बनावटीची 12 लाखांची अवैध दारू जप्त, ५ जणांना अटक