नांदेड - काँग्रेस पक्षाची आर्थिक धोरण स्पष्ट असून याआधीही पक्षाने अन्नधान्य सुरक्षा योजना यशस्वीरित्या राबविली. डॉ. मनमोहनसिंग आणि पी. चिदंबरम यांच्यासारख्या अर्थतज्ञांशी चर्चा करूनच राहुल गांधींनी ७२ हजार रुपयाच्या 'न्याय' योजनेची घोषणा केली आहे. ही योजना जुमला नसून काँग्रेस सत्तेत आल्यानंतर आम्ही यशस्वीपणे राबवू, असे आश्वासन खासदार अशोक चव्हाण यांनी दिले आहे.
त्यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यांनतर ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या विषयावर आपले मत दिले. मला नांदेडमध्ये गुंतवून ठेवण्याचा भाजप विचार करत असेल. मात्र, तो त्यांचा गैरसमज आहे. मी राज्याचा प्रदेशाध्यक्ष असून मला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यभर फिरायचे आहे. राज्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी राज्यातील अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ देणार, असे ते यावेळी म्हणाले. हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी खासदार राजीव सातव प्रचारसाठी येणार असून ते लवकरच हिंगोली येथे प्रचाराचा धुरा सांभाळतील, असे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कधीही नुकसान होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांना दर वर्षी ७२ हजारांची मदत देण्याची घोषणा राहुल गांधींनी केली. देशात काँग्रेसचे सरकार आल्यास गरिबांना सन्मानाने जगता यावे, यासाठी वार्षिक ७२ हजार रुपये २५ कोटी गरिबांना देण्याचे आश्वासन गांधींनी दिले आहे. मात्र, भाजपच्या १५ लाख रुपयाप्रमाणेच हाही जुमलाच असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. याविषयी चव्हाण यांना विचारले असता त्यांनी पक्ष सत्तेत आल्यास या योजनेची योग्य अंमलबजावणी होईल असे, आश्वासन दिले. काँग्रेसकडे मनमोहनसिंग, पी. चिदंबरम यांच्यासारखे मोठे अर्थतज्ञ आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून उपाययोजनेचा आराखडा तयार करूनच ७२ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे, असे ते म्हणाले.