नांदेड - प्रेमात आणि युद्धात सारे काही माफ असते, असे म्हणतात. त्याला जोडून आता निवडणुकीत सारे माफ असते, असे म्हणायची वेळ आली आहे. त्याचे कारण म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा व्हायरल झालेला एक व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये चव्हाण चक्क खोटं बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे सध्या नांदेडमध्ये चव्हाण चांगलेच चर्चेत आले आहेत आणि काय राव अशोकराव तुम्ही सुद्धा...! असं म्हणायची वेळ लोकांवर आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सध्या नांदेड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. मोदी लाटेत नांदेडकरांनी साथ दिल्यामुळे चव्हाण तरले. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बितनाळ येथे बोलताना अशोक चव्हाणांनी चक्क अफवा सोडली. ही अफवा होती नरेंद्र मोदींची सभा रद्द झाल्याची. मोदींची सभा रद्द झाली, असे सांगताना अशोक चव्हाण या व्हिडिओत दिसत आहेत.
६ एप्रिल रोजी नांदेडमध्ये भाजपचे लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेची संपूर्ण तयारी देखील झाली होती. सभा सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात बितनाळ या गावात प्रदेश्याध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रचार सभा सुरू असताना, मोदींची नांदेडातील सभा रद्द झाली असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलतात, असा आरोप काँग्रेस नेते नेहमी करतात. पण हा आरोप करणारे काँग्रेस नेते मतदारांची तशाच पद्धतीने दिशाभूल करताना दिसत आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण मोदींचाच कित्ता गिरवत आहेत की, काय अशी चर्चा लोकामध्ये रंगली होती.