नांदेड - जिल्ह्यात होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा त्वरित दूर करावाअन्यथा भाजपाच्या वतीने घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच औषधी सहआयुक्त राठोड यांना निवेदन देण्यात आले आहे.
इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईक तणावात...!
कोरोना आजाराची वाढती रुग्णसंख्या पाहता गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा होता. त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांना कोविड हॉस्पिटल येथील औषधी दुकानात इंजेक्शन मिळत नसल्यामुळे सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रचंड तणावात आहेत.
साठेबाजी करून इंजेक्शनचा काळाबाजार...!
काही साठेबाज इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत. तसेच आपण नियुक्त केलेले अधिकारी मोबाइल कॉल्स उचलत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वांना रेमडिसीवीर हे इंजेक्शन शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीत देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा नाईलाजास्तव भारतीय जनता पार्टीतर्फे "घेराव आंदोलन" करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले. यावेळी महानगराध्यक्ष प्रवीण साले, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, सोशल मीडिया प्रभारी राज यादव, केदार नांदेडकर, गजानन जोशी यांनी राठोड आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात गंभीर स्थिती - प्रविण साले
रेमडिसीवीर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा करुन काळाबाजर करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, कारण रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक त्रस्त आहेत. तसेच यासंदर्भात भाजपा कोविड वॉररूममध्ये तक्रारी येत असल्याची प्रतिक्रिया भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी दिली.