नांदेड - शहरातील गुरुद्वारामध्ये अडकलेल्या पंजाब येथील भाविकांचा दुसरा जथ्था शनिवारी रात्री पंजाबला रवाना झाला. यामध्ये 15 बसेसमधून 460 भाविक पंजाबला गेले. यापूर्वी देखील ३३० भाविकांना पंजाबला पाठवण्यात आले होते.
पंजाब आणि हरियाणा राज्यातील तब्बल चार हजार भाविक नांदेडला गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी आले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वजण अडकून पडले होते. त्यांना परत पाठविण्यासाठी गुरुद्वारा बोर्डाकडून वारंवार मागणी केली जात होती. पंजाब सरकाराने देखील यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य शासनाने परवानगी दिल्याचा दावा करत भाविकांना परत पंजाब आणि हरियाणाला पाठवले जात आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये ३३० भाविकांना पाठविण्यात आले. त्यानंतर शनिवार दुसऱ्या टप्प्यात ४६० भाविकांना १५ बसेसमधून रवाना करण्यात आले. उर्वरीत भाविकांनी टप्प्या-टप्प्याने पंजाबला पाठवले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंजाबचे मुख्यमंत्री अमिंदरसिंग, पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील यांच्या केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी यासाठी मदत केल्याचे गुरुद्वारा बोर्डाकडून सांगण्यात आले.