नांदेड : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते कश्मिरपर्यंत निघालेल्या भारत जोडो यात्रेची ( Bharat jodo Yatra ) देशात सर्वत्र चर्चा सुरू आहे. देगलूर मार्गे महाराष्ट्रात दाखल होऊन या यात्रेला तीन दिवस झाले आहे. राज्याच्या सर्व भागातून काॅंग्रेसचे बडे नेते, पदाधिकारी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत ते पदयात्रेत सहभागी होत आहेत. असे असताना नांदेडच्या शेजारीच असलेल्या जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख ( Former minister Amit Deshmukh) व त्यांचे आमदार बंधु धीरज देशमुख ( Dheeraj Deshmukh ) हे मात्र अद्याप भारत जोडो सहभागी झालेले नाहीत.
देशमुख बंधुंनी यात्रेकडे पाठ फिरवली? - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह बहुतांश नेते भारत जोडोत हिरारीने सहभागी झाले आहेत. देशमुख बंधुंनी मात्र फक्त सोशल मिडियाच्या माध्यमातूनच आतापर्यंत यात सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. पक्षाचे सर्वोच्च नेते, नव्याने निवडलेले अध्यक्ष यांची उपस्थितीत असतांना देशमुख बंधुंनी यात्रेकडे पाठ कशी फिरवली? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी गेल्या महिनाभरापासून सुरू आहे.
कॉंग्रेसच्या या नेत्यांचे नियोजन - यासाठी राज्यातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे पार पडले. माजी मंत्री व काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील यात्रेच्या स्वागताची व पुढील मार्गाची सगळी तयारी आणि नियोजन केले. त्याप्रमाणे आज तिसऱ्या दिवशी भारत जोडो यात्रेला आणि राहुल गांधीच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेत अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, माणिकराव ठाकरे, प्रणिती शिंदे, माजी मंत्री नसीम खान, भाई जगातप यांच्यासह युवक काॅंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
देशमुख बंधूंची अनुपस्थिती का ? - मात्र महाराष्ट्रातील तीन दिवसांच्या या यात्रेत लातूरचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख व लातूर जिल्ह्यातील काॅंग्रेसचे पदाधिकारी फिरकले नाही. याबद्दल आता कुजबुज सुरू झाली आहे. कॉंग्रेस पक्षात चव्हाण विरुद्ध देशमुख असा अंतर्गत वाद आणि संघर्ष याची किनार या अनुपस्थितीमागे नाही ना? असे देखील बोलले जात आहे. नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेवर अशोक चव्हाण यांचा सर्वाधिक प्रभाव असल्यामुळे देशमुखांनी इथे येणे टाळल्याची चर्चा आहे.
या ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता - हिंगोली जिल्ह्यात जेव्हा यात्रा पोहचेल तेव्हा तिथे दोन्ही देशमुख बंधू हेजरी लावणार असल्याचे सांगितले जाते. एकंदरित एकीकडे राहुल गांधी हे भारत जोडोचा संकल्प घेऊन देशभरात पायी चालत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेत्यांमध्ये असलेला अंतर्गत कलह या निमित्ताने चव्हाट्यावर आल्याचे दिसते.