नांदेड - पालकमंत्री चव्हाण उपचारासाठी मुंबईला गेल्यामुळे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी सवाल उपस्थित केला आहे. नांदेडच्या आरोग्य सेवेवर चव्हाणांना विश्वास नाही का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असल्याचे त्यांनी म्हटले. यानंतर काँग्रेसने याला प्रत्युत्तर दिले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आग्रहावरून चव्हाण मुंबईला गेले असल्याचे काँग्रेसने सांगितले.
एकीकडे बरे होण्यासाठी सदिच्छा द्यायच्या आणि दुसरीकडे राजकारण करायचे अशांना जिल्हा ओळखून आहे, असा टोला आमदार अमर राजूरकर यांनी चिखलीकरांना लगावला आहे. यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये पुन्हा कलगीतुरा सुरू असून भर कोरोनातही चांगलेच राजकारण रंगले आहे.
भाजपचे प्रतापराव चिखलीकर पत्रक काढून आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारे अशोक चव्हाण हे केंद्र आणि राज्याच्या सत्तेच्या राजकारणात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. नांदेडच्या आणि काँग्रेसच्या राजकारणात अशोकरावांची नितांत गरज आहे. त्यामुळे, त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारली पाहिजे. परंतु, त्यांना नांदेडला योग्य आरोग्यसेवा उभारता आली नसल्याचे दिसून येते.
वास्तविक नांदेड शहरामध्ये ७९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा, आरोग्य यंत्रणा योग्यरीतीने काम करत असल्याने ते रुग्ण बरे झाले आहेत. अशात नांदेडच्या आरोग्य सेवेत उपचार न घेता पालकमंत्री मुंबईला उपचार घेण्यासाठी जाणे, हे येथील आरोग्य विभागावर आणि त्यांच्या कामावर अविश्वास दाखवण्यासारखे आहे.
अशोक चव्हाण यांच्यावर नांदेडमध्ये जर उपचार करण्यात आले असते किंवा त्यांनी येथेच उपचार घेतले असते तर नांदेडच्या आरोग्यसेवेवरही विश्वास निर्माण झाला असता. दुर्दैवाने नांदेडच्या आरोग्य यंत्रणेला ही संधी मिळाली नाही. अशोकराव लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात ते लवकरच परत येतील. परंतु , बरे होऊन आल्यानंतर त्यांनी नांदेडची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी व लोकांचाही आरोग्य विभागावर विश्वास बसण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मतही चिखलीकर यांनी व्यक्त केले आहे.
या सदिच्छा की राजकारण?
चिखलीकरांच्या या टीकेला आमदार अमर राजूरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकांमध्ये जाऊन काम करत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाली. यानंतर उपचारासाठी नांदेडमधील एका रूग्णालयात त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना तात्काळ मुंबईला या असा आग्रह धरला. त्यामुळेच त्यांना मुंबईला हलवण्यात आले. यातही काही जणांकडून राजकारण होत आहे. एका बाजूस त्यांना बरे होण्याच्या सदिच्छा देताना राजकारण करण्याचा जो काही प्रयोग होत आहे, तो अतिशय खालच्या पातळीचा असल्याचे मत विधान परिषदेचे अमरनाथ राजुरकर यांनी व्यक्त केले.
पुढे राजुरकर म्हणाले, देशात आणि राज्यात जेव्हा कोरोनाचा प्रसार होत होता अशावेळी नांदेड जिल्हा या रोगापासून दूर राहिला पाहिजे यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अहोरात्र प्रयत्न केले. वारंवार बैठका घेत प्रशासनास सूचना केल्या. जिल्हा नियोजन समितीच्या उपलब्ध निधीपैकी 33 टक्के निधी हा आरोग्य सेवेसाठी वापरण्यात यावा असा आदेश दिला.
अशोक चव्हाण लवकरच या आजारातून मुक्त होवून जिल्ह्यातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सहभागी होणार आहेत. अशावेळी एका बाजूस त्यांनी बरे व्हावे ह्या शुभेच्छा देताना दुसर्या बाजूस जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेवर विश्वास नाही काय? अशा पद्धतीने प्रश्न विचारणे म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ज्यांनी हा आरोप केला त्यांना जिल्ह्यातील जनता चांगलेच ओळखून आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची सुश्रुशा व सेवा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून यावर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे सूक्ष्म लक्ष असल्याचेही आमदार राजुरकर यांनी यावेळी म्हटले.