नांदेड- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संकट ओळखून भोकर तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकलेला सर्वच गहू गोरगरीब, गरजू लोकांना वाटून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
हेही वाचा- #Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'
देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या लोकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे गोरगरीब गरजू लोकांच्या मदतीला भोकर शहरातील जेठीवा नगर येथील एक शेतकरी आला आहे. त्याने शेतात पिकलेला सर्वच गहू गरजूंना वाटला आहे.
निळकंठ वर्षेंवार असे त्या शेकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकलेला दहा क्विंटल गहू शहरतील गोरगरीब व गरजूंना वाटला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे सध्या सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. देशात निळकंठ सारख्या शेतकऱ्यासारखे देणारे हात अजून तयार झाले तर एकही जण उपाशी राहणार नाही हे मात्र खरे.