नांदेड - कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आपत्कालीन उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे (शुक्रवार) आजपासून दिनांक ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला असून सात ऐवजी सायंकाळी पाच वाजता दुकाने बंद होणार आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत घेतला निर्णय-
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. तसेच शहरातील विविध धार्मिक स्थळांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यात म्हटले की, मिशन बिगीन अगेन अंतर्गत जिल्ह्यामध्ये आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून काही निर्णय घेण्यात येत आहेत.
नियमित धार्मिक विधी सुरू राहणार-
शुक्रवारपासून जिल्ह्यातील सर्व मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, गिरीजाघर , बौद्धविहारसह इतर धार्मिक स्थळे, मंदिरे ३१ मार्चपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्यात येत आहे. फक्त पुजारी व धर्मगुरुंना नियमित धार्मिक विधी करता येणार आहेत.
औषध विक्रेत्यांना असणार सूट-
दुकानांच्या वेळेमध्येही बदल करण्यात आला असून शुक्रवारपासून सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच दुकाने सुरु ठेवता येणार आहे. यामध्ये औषध विक्रेत्यांना सुट असणार आहे. या आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन , साथरोग कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा- कोरोना कहर.. खासगी व सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती, सरकारचे आदेश