नांदेड - कृष्णूर येथील शासकीय धान्य घोटाळा प्रकरणातील अटकेत असलेले इंडिया मेगा अॅग्रो अनाज कंपनीचे अजय बाहेती यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यासाठी बाहेती यांना ४ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. गेल्या ६ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बाहेती हे तुरुंगातच होते.
तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी कृष्णूर येथील 'मेगा अॅग्रो अनाज कंपनी'वर जुलै महिन्यात धाड टाकली होती. तत्पूर्वी अनेक दिवस पोलीस कर्मचारी धान्याच्या या काळाबाजारावर लक्ष ठेवून होते. शासकीय धान्य गोदामातून निघालेली वाहने कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीत जात असल्याचे पोलिसांनी चित्रिकरणही केले होते. पोलिसांच्या धाडीत गोदामात शासकीय धान्याचे १० ट्रक आढळून आले, आणि जवळपास ५२ लाख रुपयांचे धान्य पोलिसांनी जप्त केले होते. यावेळी पकडलेल्या १० ट्रक चालकांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
धान्याच्या काळाबाजाराची मोठी साखळी लक्षात घेता या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे देण्यात आला. हसन यांनी अत्यंत बारकाईने या प्रकरणाचा तपास करीत धान्याच्या काळाबाजाराचे मोठे रॅकेट असल्याचे उघडकीस आणले. परंतु, त्यानंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, अनेकांनी सीआयडी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सीआयडीचे कान टोचल्यानंतर मे महिन्यात कंपनीचे मालक अजय बाहेती, धान्याचे वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार, ललितराज खुराणा, व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया या ४ जणांना अटक करण्यात आली. तसेच २ शासकीय गोदामपाल आणि २ अव्वल कारकून यांनाही अटक करुन या सर्व आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.
हेही वाचा - पत्नीशी फारकत घेवून दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या पतीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
अटकेत असलेल्या आरोपींनी अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला. परंतु, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढतच गेला. दरम्यान, कंपनीचे मालक अजय बाहेती यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यावेळी न्यायालयाने ४ कोटी भरल्यानंतरच जामीन मंजूर करण्यात येईल, असे आदेश दिले. त्यानंतर बाहेती यांना जामीन मंजूर झाला परंतु, त्यासाठी त्यांना ४ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. सोबतच आपला पासपोर्टही पोलिसांकडे जमा करावयाचा आहे. पोलिसांनी पाचारण केले त्यावेळेस चौकशीसाठी त्यांना हजर रहावे लागणार आहे.
हे ४ कोटी भरण्यासाठी बाहेती यांना ६ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. बाहेती यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर लगेच त्यांना नायगाव न्यायालयात १ कोटी रुपयांचा भरणा करावयाचा आहे. त्यानंतर दर महिन्याला ५० लाख रुपये प्रमाणे ६ महिन्यांत ३ कोटी रुपये भरणे आवश्यक आहे. ४ कोटींच्या विवरणात एकही हप्ता चुकला तरी, बाहेतींचा जामीन रद्द होणार आहे़. यासह इतर अनेक अटी बाहेतींना जामीन देताना न्यायालयाने घालून दिल्या आहेत. त्याचबरोबर तपासात पोलिसांना सहकार्य करावे लागणार असून देशाबाहेर जाण्यासाठीही त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे.
हेही वाचा - वलघ्या... वलघ्या...च्या गजरात शेतकऱ्यांनी केली वेळ अमावस्या साजरी