नांदेड MP Hemant Patil on FIR : नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावल्याप्रकरणी खासदार हेमंत पाटील यांच्यावर नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे राजकीय षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया खासदार हेमंत पाटील यांनी दिलीय.
काय म्हणाले हेमंत पाटील : नांदेडच्या शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे तीन ते चार जिल्ह्यातील रुग्णांसाठी व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. हिंगोली मतदार संघातून याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी व विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या रुग्णालयात गेल्या तीन दिवसात 41 रुग्ण दगावले. हे रुग्ण दगावल्यानं यासंदर्भात मी अधिष्ठातांना भेटायला गेलो, तेव्हा अधिष्ठातांचं स्वतःचं शौचालय अत्यंत घाण व दुर्गंधीयुक्त होतं, असं खासदार हेमंत पाटील यांनी म्हटलंय. तसंच गांधी जयंतीला देशाच्या पंतप्रधानांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे त्यामुळे आपण दोघं मिळून स्वच्छतागृह साफ करू, असं मी त्यांना म्हणालो. मी खासदार असताना देखील स्वतः पाणी टाकून शौचालय त्यांच्यासोबत साफ केलं. तेव्हा त्यांना कुठल्याहीप्रकारे जातीवाचक शिवीगाळ केली नाही, असा खुलासा खासदार हेमंत पाटील यांनी केलाय.
हे राजकीय षडयंत्र : मागील 40 वर्षापासून माणूस हाच केंद्रबिंदू ठेवून मी राजकारण केलं. आजपर्यंत कधी जात विचारली नाही. अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी या नात्यानं आम्ही काही प्रश्न विचारले, तर अशाप्रकारे ॲट्रॉसिटी प्रमाणे खोटे गुन्हे नोंद होत असतील, तर ही गंभीर बाब आहे. जी बालकं मेली त्याच्या संदर्भात चर्चा होत नाही. कुठल्या संघटना आंदोलन करत नाहीत. परंतू, एका अधिष्ठाताला त्यांचं स्वतःचं शौचालय मी साफ करायला लावल्यावर माझ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. यात शंभर टक्के राजकारण आहे. रात्री तीन वाजता देशाच्या सर्वोच्च सदनातील लोकप्रतिनिधींवर वर गुन्हा दाखल होते, हे राजकीय षडयंत्र आहे. मी खरंच जातीवाचक शिवीगाळ केली, तर माझ्यावर गुन्हा नोंद करा. परंतू, कुठलीही जातीवाचक शिवीगाळ केली नसताना सुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद होत असेल, तर हे अतिशय चूक असल्याचं खासदार हेमंत पाटील म्हणाले.
हेही वाचा :
- Nanded Hospital Death Case : नवजात बाळासह आता आईनंही सोडला श्वास; नातेवाईकांचा आक्रोश
- Nanded Hospital Death Case : मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल; रुग्णालयातील मृतांची संख्या 41 वर
- Nanded Hospital Death : नांदेडमधील रुग्णालयात आणखी ७ मृत्यू, मृतांचा आकडा ३१ वर, काहीजण अत्यवस्थ