नांदेड - 5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अवघ्या 64 दिवसांमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्ह्यातील दिवशी बु. गावात 5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपीला भोकर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायमूर्ती मुजीब शेख यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. बाबू खंडेराव सांगेराव ( वय 35) असे या आरोपीचे नाव आहे.
सालगड्यानेच केला चिमुरडीवर अत्याचार
भोकर तालुक्यातील 'दिवशी' येथे आरोपी बाबू सांगेराव हा सालगडी म्हणून कामाला होता, पीडित चिमुकली देखील त्याला ओळखत होती. मुलगी आपल्या वडिलांसोबत शेतात आली होती. शेतात कांदे पेरणी सुरू होती. पीडितेच्या वडिलांनी या सालगड्याला मुलीला घरी सोडण्यास सांगितले. मात्र आरोपी या चिमुकलीला घरी घेऊन आलाच नाही. त्याने चिमुकलीला शेतालगतच्या नाल्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला, व तोंड दाबून तिची हत्या केली. दरम्यान संध्याकाळ झाली तरी देखील मुलगी आणि आरोपी घरी परतले नसल्याने, मुलिच्या वडिलांनी गावकऱ्यांच्या मदीने मुलीचा शोध घेतला. शोध सुरू असताना शेत परिसरात असलेल्या नाल्याजवळ या मुलीची चप्पल आढळून आली. गावकऱ्यांनी त्या परिसरात आणखी शोध घेतला असता तिथे ही चिमुकली त्यांना मृत अवस्थेमध्ये आढळून आली होती. दरम्यान आरोपीचा शोध घेतला असता तो देखील शेजारीच असलेल्या झुडपांत विवस्त्र अवस्थेत लपून बसलेला आढळून आला. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अवघ्या 64 दिवसांमध्ये आरोपीला फाशी
पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून, अवघ्या 21 दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणी पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने साक्षी, पुराव्याच्या आधारे आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अत्यांत कमी कालावधीत या खटल्याची सुनावणी होऊन, आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा - अरे बाबा, मी हॉस्पिटलमध्येच होतो... अनिल देशमुखांनी दिले स्पष्टीकरण