नांदेड - आज सकाळी दहा वाजता मुदखेड तालुक्यातील इसार पेट्रोल पंपाजवळील वळण रस्त्यावर नांदेडहून येत असलेल्या मालवाहू ट्रक आणि नांदेडकडे मुखेडहून जात असलेल्या ऑटोची समोरासमोर धडक झाली. या धडकेत जागेवरच पाच लोकांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातातील इतर सात गंभीर जखमींना पुढच्या उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवल्याची माहिती त्या ठिकाणी उपस्थित लोकांनी दिली.
जाग्यावरच पाच जणांचा मृत्यू - मुदखेड तालुक्यात मागील पाच महिन्यापूर्वी असाच एक अपघात होऊन त्या अपघातामध्ये तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यानंतर आज दिनांक 30 मार्च 2023 रोजी आणखी एक अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की त्यामध्ये जाग्यावरच पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे सरोजा रमेश भोई ४० रा. मेहकर जि. बुलडाणा गाली कल्याण भोई २४ रा गेवराई बीड,जोयल कल्याण भोई गेवराई, बीड, पुंडलीक किशनराव पोलाटकर रा सावरगाव माळ ता भोकर, एक ज्येष्ठ नागरिक वय ७० त्यांचे नाव समजू शकले नाही. त्यांचाही यामध्ये मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या लोकांना मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आल्याची माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळताच मुदखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक कमल शिंदे यांच्यासह मुदखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
लोकांची मदतीसाठी लगेच धावपळ - घटनेची माहिती मिळताच मुदखेड शहरातील नागरिकांनी अपघातस्थळी मृत्यू पावलेल्या लोकांना रुग्णवाहिकेमध्ये टाकण्यासाठी शेख रिजवान, शेख इमरान भंगारवाले, शेख मोहसीन बागवान, खाजाभाई कुरेशी, ऋषिकेश पाटील पारवेकर, भीमराव पाटील कल्याणे या लोकांनी अपघात स्थळी मदत केली. घटना एवढी भीषण होती की रस्त्यावर सगळ्यांचे मृतदेह पडले होते.
घटनास्थळी पोलीस पोचून पंचनामा करण्यात आला. पोलीस व नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयाकडे घालवण्यात आले. यावेळी मोठ्या वाहनांना वेगळा रस्ता करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत अशी भावना लोकांनी व्यक्त केली. तसेच या भागात वाहतूक वाढल्याने लोकांनी चिंता व्यक्त केली आहे.