नांदेड- कोरोनाच्या संकटामुळे वैवाहिक जीवन सुरू करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना आपले स्वप्न काही काळ बाजूला ठेवावे लागत आहे. यातही विवाह करायचाच असेल तर अगदीच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत घरीच, कोणताही गाजावाजा न करता पार पाडावा, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्याचे तंतोतंत पालन बिलोली तालुक्यातील लघूळ येथील एका तरुण जोडप्याने करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
सुशिक्षित नवदांपत्याने ठरल्याप्रमाणे विवाह सोहळा आपल्या रहात्या घरीच केला आहे. यावेळी नवदांपत्याचे आई, वडील आणि दोन नातेवाईक यांच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पाडला. लघूळ येथील पद्मीनबाई विजय कुडकेकर यांची कन्या पूजा विजय कुडकेकर परिचारिका म्हणून काम करतात. तर, याच गावातील लक्ष्मीबाई यादव मिरजे यांचे चिरंजीव सुरेश मिरजे सध्या पुणे येथे एका कंपनीत कार्यरत आहेत. पूजा आणि सुरेश यांचा विवाह २९ मार्च रोजी ठरला होता. सत्यशोधक पद्धतीने दोन्ही कुटुंबांनी लग्नाची तयारीही सुरू केली. नातेवाईकांना निमंत्रणही गेले होते.
दरम्यान, कोरोना आजार आटोक्यात आणण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक उपाय योजना करण्यात आल्या. शासनाच्या नियमांचे व जमावबंदीचे उल्लंघन होऊ नये व विवाह सोहळा संपन्न व्हावा यासाठी मिरजे व कुडकेकर या दोन्ही परिवाराने विचारविनिमय केला. हा विवाह सोहळा अतिशय कमी लोकात पार पाडण्याचे या कुटुंबाकडून नियोजन करण्यात आले. शिक्षण ज्योती सावित्रीबाई फुले व सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून राहत्या घरात वधू-वराच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने व साक्षीने, शिवाय दोन अतिशय जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. सामाजिक भान असलेल्या या कुटुंबांनी विवाहाचा सर्व डामडौल टाळला. दोन्ही कुटुंबांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून सामाजिक संदेश दिले.
हेही वाचा- भरधाव मालवाहू ट्रकची दुचाकीला धडक.. दोघांचा मृत्यू, नांदेड-लातूर महामार्गावरची घटना