नांदेड - जिल्ह्यातील बारड (ता.मुदखेड) येथे माकड खांद्यावर बसल्याने विरु नागेश संगेवार या दहा वर्षीय बालकाचा घाबरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावरही शोककळा पसरली आहे.
माकडे व वानरं यांचा गावात मुक्त संचार
गेल्या अनेक वर्षांपासून माकड-वानरांनी गावात धुमाकूळ घातला आहे. पिसाळलेली माकडे व वानरे यांचा गावात मुक्त संचार असल्याने घरात घुसून अन्नधान्याची नासधूस, लहान मुले व महिलावर हल्ला चढविण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यापूर्वी माकडाच्या हल्ल्यात अनेक महिलांना गंभीर जखमी केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे माकड व वानरांची बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाकडे केली होती. माकड-वानरे उपद्रव्यांच्या विरोधात अनेकवेळा आवाज उठवला होता. त्यांनतर स्थानिक प्रशासनाने वनविभागाच्या साहय्याने वानर व माकडांच्या टोळ्यांना जेरबंद करून दूरवर जंगलात नेऊनही सोडले होते.
बंदूकधारी वानर व माकड रक्षक कमी केला?
मुदखेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायत सर्वात मोठी व आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. यापूर्वी ग्रामपंचायत अंतर्गत कर्मचाऱ्यांमध्ये वानर व माकडापासून बचाव करण्यासाठी ग्रामपंचायतने कर वसुलीतून वानररक्षक कर्मचाऱ्यास पगार दिला जात होता. पिसाळलेल्या माकड व वानरांच्या बंदोबस्तासाठी कर्मचाऱ्याकडे आवाज निर्माण करणारी बंदूकसुद्धा होती. परंतु स्थानिक प्रशासनाने वानर रक्षक कर्मचाऱ्यास कामावरून कमी करून टाकल्याने, गावात पुन्हा 'वानरराज व माकडराज' पहावयास मिळत आहे. गेल्या सहा वर्षांपासून ग्रामपंचायतकडे बंदूकधारी वानर रक्षक नसल्याने, गावात प्राण्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडूनही वानर रक्षकाची नियुक्ती का केली नाही? असा थेट सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत.