नांदेड - येथील एका पोलीस कर्मचाऱ्यास सेवानिवृत्त उपविभागीय अधिकाऱ्याने बेदम मारहाण केल्याची घटना १९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास देगलूर येथे घडली. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून उपविभागीय अधिकाऱ्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी रमेश कंतेवार यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. त्यासमोर पोलीस कर्मचारी गणपत बाबूराव शेळके हे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचे शासकीय कर्तव्य बजावत होते. त्यावेळी सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी रमेश कंतेवार यांच्यासह सुधाकर कंतेवार व अन्य दोघांनी पोलीस कर्मचारी शेळके यांना रेतीचा ट्रॅक्टर थांबवून पैसे घेतो का? असे म्हणत शटरमध्ये नेवून त्यांना जबर मारहाण केली.
त्याबरोबरच पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी शेळके यांच्या तक्रारीवरुन देगलूर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी रमेश कंतेवार यांच्यासह अन्य 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गिते करत आहेत.