नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 70 अहवालांपैकी 552 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 275 तर अँटिजेन तपासणीद्वारे 277 अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 27 हजार 923 एवढी झाली आहे. तर नाईकनगर नांदेड येथील 46 वर्षांच्या पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 618 वर गेली आहे.
2 हजार 971 सक्रीय रुग्ण
मंगळवारच्या 2 हजार 70 अहवालापैकी 1 हजार 472 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 27 हजार 923 एवढी झाली असून यातील 24 हजार 112 बाधितांना औषधोपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकुण 2 हजार 971 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 60 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. उपचार सुरू असलेल्यांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 143, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 77, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 78, किनवट कोविड रुग्णालयात 54, मुखेड कोविड रुग्णालयात 55, देगलूर कोविड रुग्णालयात 14, हदगाव कोविड रुग्णालयात 8, लोहा कोविड रुग्णालयात 48, कंधार कोविड केअर सेंटरमध्ये 2, महसूल कोविड केअर सेंटरमध्ये 85 जणांचा समावेश आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 1 हजार 702 जण, तर नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात 477 जण आणि खाजगी रुग्णालयात 258 जण आहेत. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 40 खाटा, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 25 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोनासंबंधी संक्षिप्त माहिती
- एकूण घेतलेले स्वॅब - 2 लाख 54 हजार 209
- एकूण निगेटिव्ह स्वॅब - 2 लाख 11 हजार 546
- एकूण पॉझिटिव्ह व्यक्ती - 27 हजार 923
- एकूण रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेले रुग्ण - 24 हजार 112
- एकूण मृत्यू संख्या - 618