नांदेड - मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. यासोबतच जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्प व बंधाऱ्यात पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण एकशे अकरा प्रकल्पात ३४६.४४ दशलक्ष घन मीटर म्हणजे ४७.८१ टक्के पाणीसाठा झाला आहे.
विष्णुपुरी व्यतिरिक्त येलदरी आणि सिद्धेश्वर जलाशय पाणीसाठा वाढण्याच्या प्रतिक्षेत आहेत. इसापूर धरणात देखील केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक झाला आहे. या तिन्ही प्रकल्पातील पाणीसाठ्याचा फायदा नांदेड जिल्ह्यातील सिंचनक्षेत्रासाठी होतो.
हेही वाचा - चांद्रयान-2 मोहीम : लँडरशी संपर्क तुटला, परंतु अजूनही आशा जिवंत - शास्त्रज्ञ अरविंद परांजपे
जिल्ह्यात यंदा जून-जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा झाला नव्हता. परिणामी नांदेड शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाईची स्थिती कायम होती. दरम्यान, पोळा झाल्यानंतर जिल्ह्यात सतत तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे काही प्रकल्पात पाणीसाठा वाढला.