नांदेड- तरोडा येथे विजेच्या तारेला स्पर्श होऊन जोरदार झटका लागल्याने चार वर्षीय चिमुकलीने आपले हात गमावले आहे. श्रृती गंगाधर रोडगे असे पीडित मुलीचे नाव असून तिच्या घरच्यांची परिस्थिती हलाखीची आहे. इतकी मोठी घटना घडूनही महावितरणने मात्र, या घटनेची साधी दखलही घेतली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहरातील तरोडा भागात गंगाधर रोडगे हे एका खासगी वाहनावर चालक असून भाड्याच्या घरात राहतात. तुटपुंज्या पगारावर पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा अशा चार तोंडाचा घास भरवताना त्यांची रोजची लढाई सुरू असते. गंगाधर यांची चार वर्षाची चिमुकली श्रृती ही घराच्या छतावर नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी गेली होती. या दरम्यान जवळून जाणाऱ्या महावितरणच्या तारेला श्रृतीच्या हाताचा स्पर्श झाला. त्यामुळे, तिचे दोन्ही हात निकामी झाले. एवढ्या मोठ्या धक्क्यातून ती कशीबशी बचावली. तिच्या वडिलांनी तिला उपचारासाठी नांदेड, मुंबई, कोल्हापूर येथील रुग्णालयात नेले. शेवटी डॉक्टरांनी तिचे दोन्ही हात मनगटापासून वेगळे करण्याचा निर्णय घेतला. श्रृतीच्या भविष्यासाठी रोडगे दामपत्याला डॉक्टरांचा तो निर्णय स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता आणि श्रृतीला आपले दोन्ही हात गमवावे लागले.
या उपचारातून श्रृती बचावली आहे. परंतु, रोज वही-पेन पकडणारे दोन्ही हात आपल्यासोबत नाहीत हे स्वीकारायाला श्रृती आणि तिचे आई वडील तयार नाहीत. एका निरागस बालिकेला एवढा मोठा धक्का लागूनही महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही. त्यांना मदत करण्यासाठी अद्याप कुणीही पुढाकार घेतला नाही. श्रुतीला आपले आयुष्य पुन्हा घडवायचे आहे. आयुष्यातल्या संकटांशी दोन्ही भुजांनी संघर्ष करून जगायचे आहे. त्यासाठी तिला पाठबळ देण्यासाठी, मदत करण्यासाठी समाजातील संवेदनशील लोकांनी पुढे येणे आवश्यक आहे. शहरातील ज्ञानप्रबोधनी गर्ल्स हॉस्टेलच्या संचालिका सौ. रुक्मिणीताई बोरकर यांनी तिच्या पालकाला ११ हजारांची मदत केली आहे. परंतु, ती अपुरी आहे. तुमच्यापैकी अनेक जण तिच्या हातांचे बळ होऊ शकतात. इच्छुकांनी मदत करण्यासाठी ९५५२८०६६४९ या क्रमांकावर संपर्क साधावा.