नांदेड - शहरातील मोंढा कॉर्नर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय ) बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 2 अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बुधवारी सायंकाळी 5 वाजता, शहरातील मोंढा कॉर्नर परिसरातील एसबीआय बँकजवळ काही सराईत गुन्हेगार येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामध्ये शहरातील रेकॉर्डवरील 2 सराईत गुन्हेगारांचा समावेश होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या परिसरात पाळत ठेवली असता, त्यांना 5 गुन्हेगार आढळून आले. त्यांच्यापैकी शेख इसाक शेख सुलतान (रा.गुम्मट बेस देगलूर), शेख रहीम शेख गफुर (रा. मेंडका ता. मुदखेड) यांना पकडण्यात यश आले तर इसाकचा भाऊ शेख इस्माईल शेख सुलतान, शेख सोहेल (रा. पिर बुऱ्हाणनगर) तसेच आणखी एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून लोखंडी रॉड, छऱ्याचे पिस्तूल, मोटारसायकल पोलिसांनी जप्त केले आहे.
दरम्यान, शेख इसाक आणि शेख रहीम शेख गफुरला पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी मोहन कंधारे, ब्रुवान लुंगारे, दत्ता मलदोडे, संजय यमलवाड यांनी ही कारवाई केली असुन, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पुनम सूर्यवंशी करीत आले.