नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील बामणी येथे मेंढला नाल्यावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. एकूण ५ जण पोहायला गेले होते. त्यापैकी गजानन मुंगल नावाच्या तरुणाने तिघांना वाचवले. मात्र, त्याच्या सख्ख्या भावाला तो वाचवू शकला नाही. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बामणी गावाजळून मेंढला नाला जातो. या नाल्यावर बंधारा बांधण्यात आला असून सध्या हा बंधारा तुडुंब भरला आहे. या बंधाऱ्यात गावातील गजानन सोनाजी कदम (वय १६), दिपक दत्ताारामजी मुंगल (वय-१५), विशाल उत्तम कदम, ओमकार संतोष कदम, जगदीश दुलबा कदम हे ५ बालक दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोहण्यासठी गेले होते. पाचही जणांना बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडू लागले. सर्वजण मदतीसाठी हाक मारीत असताना गावातीलच गजानन दत्तारामजी मुंगल हे आपल्या शेतातून घरी परत येत होते. त्यावेळी त्यांच्या कानावर मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. ५ जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विशाल उत्तम कदम, ओमकार संतोष कदम, जगदीश दुलबा कदम यांना पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, गजानन सोनाजी कदम (वय १६), दिपक दत्तारामजी मुंगल (वय-१५) या बालकांचा पाण्यात बूडून मृत्यू झाला. यामध्येच त्याचा सख्खा भाऊ दिपक मुंगल देखील होता. मात्र, त्याला तो वाचवू शकला नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली. तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी बाळासाहेब देशमुख, पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, जमादार कोकरे, हेमंत देशपांडे, परमेश्वर कदम, विद्यासागर वैद्य, संजय कळके यांनी घटनास्थळी भेट देउन घटनेची माहिती घेतली.