नांदेड - पाणीटंचाईमुळे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात पहिला बळी गेल्याची घटना घडली. गावालगत असलेल्या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. सारिका राठोड असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. दुष्काळग्रस्त लोहा तालुक्यात अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे.
कांजळा गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईच्या तीव्र झळा येथील नागरिकांना सहन कराव्या लागतात. सद्या पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक नागरिकांना मोठी पायपीट करावी लागत आहे. या गावातील सारिका मोहन राठोड ही मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत काल पाणी आणण्यासाठी गावाजवळ असलेल्या विहिरीवर गेली होती. यावेळी तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. तेव्हा तिच्या मैत्रिणीने आरडाओरडा केला. आजूबाजूच्या नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यत सारिकाचा मृत्यू झाला होता.
विशेष म्हणजे कांजळा गावातील ही एकमेव विहीर असून, ती विहीर अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. सारिकाच्या मृत्यूमुळे कांजळा गावात सर्वत्र हळहळ केली जात आहे. गावाच्या पाणीटंचाईची शासनाने दखल घेऊन पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.