नांदेड - कंधार तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र कनिष्ठ महाविद्यालय, पानभोसी येथील परिक्षा केंद्रावर चक्क १०० रुपयांत उत्तरपत्रिका मिळत आहे. तर १ हजार रुपयात उत्तरांच्या कॅापीची विक्री सुरू आहे. ही बाब एका मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आली असून शिक्षण प्रशासनाचा भोंगळ कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. कंधार तालुक्यातील पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी हिंदी विषयाचा पेपर सुरू होता. त्यावेळी दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान, चित्रपटाचे तिकीट ब्लॅकने विकतात त्याप्रमाणे काही तरुण प्रश्नाचे उत्तर १०० रुपयाला देतो, असे सांगत होते. हे तरुण सदर प्रश्नाचे उत्तर थेट परीक्षार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी १ हजार रुपये लागतील, असे सांगत होते.
काही प्रत्यक्षदर्शीनी दुपारी साडेबारा वाजता या सर्व प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. काही तरुण १०० रुपये घेऊन उत्तरपत्रिका देतो म्हणून पैसे घेत होते. यावेळी कोणत्याही प्रकारचे निर्बंध या परीक्षा केंद्रावर पाळले जात नव्हते. या ठिकाणी मोबाईलचा सर्रास वापर सुरू होता. घडलेल्या प्रकाराची सगळीकडे माहिती होताच शिक्षण विभागाने या परिसरात भरारी पथकाची नियुक्ती केली आहे.