नागपूर - घरकाम करणाऱ्या एक तरुणीला गेल्या 15 वर्षांपासून घरात डांबून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीमा यादव असे या तरूणीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीची सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने सुटका केली आहे. आरोपींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अजूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
सीमा ही मध्यप्रदेशातील जबलपूर येथील आहे. आई, वडील आणि तीन भावंडात ती तिसऱ्या क्रमांकाची आहे. मात्र, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने चांगल्या भविष्याच्या ध्येयाने सीमाच्या आईने सीमा आणि तिच्या लहान बहिणीला नागपूरात पाठवले. सीमा नागपुरातील पेट्रोल पंप व्यावसायिक खनिजा दाम्पत्याकडे तर लहान बहीण आग्रा येथे गेली. त्यावेळी दरमहिना एक हजार रुपये आणि शिक्षण देण्यात येईल, असे आश्वासन यादव कुटुंबीयांना देण्यात आले. यानंतर 15 वर्षांची सीमा 2005 साली नागपूरच्या मेकोसाबाग येथील खनिजा कुटुंबीयांकडे रहायला आली. मात्र, यानंतर तिला एक वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले. खनिजा कुटुंबीयांनी तिला शिक्षण तर नाहीच मात्र, आश्वासन दिलेला पगारही तिला दिला नाही. खनिजा कुटुंबीयांत पती, पत्नी, दोन लहान मुले आणि एक वृद्धा इतके सदस्य आहेत.
सीमाला कुटुंबीयांचे सर्व घरकाम करावे लागायचे. सकाळी उठल्यापासून धुणी, भांडी, स्वयंपाक सर्व काही सीमाच करायची. या दरम्यान तिला कुटुंबीयांशी भेट किंवा साधे फोनवरही बोलण्याची परवानगी नव्हती. शेजारी आणि दुसऱ्या घरात काम करणाऱ्या मोलकरणी यांच्याशीदेखील बोलण्यावर तिच्यावर बंदी होती. तसेच तिला घराबाहेरदेखील पडू देत नव्हते. वर्षातून एकदा एक ड्रेस आणि तीन वेळचे जेवण एवढेच सीमाला मिळायचे. पूर्णवेळ काम करावे लागायचे. यामुळे तिने अशात बाजूच्या बंगल्यात काम करणाऱ्या एका मोलकरणीच्या सहाय्याने नागपूर शहरातीलच चुलत बहिणीशी फोनवर संपर्क साधला.
हेही वाचा - 'झाडा'झडतीला तयार; चौकशी करण्यासाठी माजी वनमंत्री स्वतः देणार पत्र
यानंतर रेल्वेत नोकरी करणाऱ्या चुलत बहिणीने याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना दिली असता सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने 15 वर्षांपासून घरात नजर कैदेत असलेल्या सीमाची सुटका केली. या प्रकरणी प्रीतपालसिंग खनिजा आणि त्यांची पत्नी मधू या दाम्पत्याविरुद्ध मानवी तस्करी आणि छळ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सीमा सोबतच तिच्या लहान बहिणीला देखील आईने खनिजा कुटुंबीयांकडे पाठवले होते. सीमाची लहान बहीण ही आरोपी मधू खनिजाच्या बहिणीकडे आग्रा येथे असल्याची माहिती आहे. नागपूरात महिलांच्या सुरक्षा, हक्क आणि कायदेशीर मदतीसाठी पोलिसांचा भरोसा सेल कार्यरत आहे. सीमाची सुटका करण्यास भरोसा सेलने सहकार्य केले. मात्र, यानंतर गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली. पोलीस आयुक्तांना घटनेची माहिती दिल्यावर जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, सीमाच्या बहिणीची सुटका करण्यात मदत करण्यासाठी असमर्थता दर्शवली. 15 वर्षांपासून एकाच घरात बंदिस्त असलेल्या सीमाची सुटका झाली. आता तिच्या लहान बहिणीची देखील सुटका करण्यात पोलिसांनी लवकर पावले उचलण्याची गरज आहे.