नागपूर - कोरोनामुळे माणसे माणसांपासून दुरावले आहेत. अनेक जण एकमेकांच्या संपर्कात येणे टाळत आहेत. तर दुसरीकडे नागपूरातील एक तरूणी लॉकडाऊनच्या काळातही भटक्या कुत्र्यांसाठी झटत आहे. भटक्या कुत्र्यांसाठी रस्त्यांवर उतरत त्यांना खाऊ घालत आहे. स्मिता मिरे असे या तरूणीचे नाव आहे. स्मिता ही कुठलाही आर्थिक मोबदला नसताना भटक्या कुत्र्यांवर महिन्याला लाखो रूपये खर्च करत आहे.
गेल्या चार-पाच महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. प्रत्येक व्यक्ती आपापली काळजी घेताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी तर एकमेकांची भेट घेणेदेखील बंद केले आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, आर्थिक संकटे ओढावली आहेत. अशा परिस्थितीत काय करावे, ही समस्या अनेकांसमोर उभी ठाकली आहे. मात्र, अशा या लॉकडाऊनच्या या संपूर्ण काळातही स्मिता मिरे ही तरुणी रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसाठी राबत आहे.
स्मिता मिरे या गेल्या ७ वर्षांपासून भटक्या कुत्र्यांसाठी काम करत आहेत. कुठलाही आर्थिक मोबदला नसताना 'सेव्ह स्पिचलेस ऑर्गनाईझेशन' या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्या काम करत आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना जेवण देणे, जखमींवर उपचार करणे ही त्यांची प्रमुख कार्य आहेत. गेल्या तीन-चार महिन्याच्या लॉकडाऊनमध्येही जेव्हा एकीकडे लोक घरात बंदिस्त असताना स्मिता यांनी माणूसकी जोपासत भटक्या कुत्र्यांना जेवण पुरवले. त्यांच्या या संस्थेला कोणतेही अनुदान मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे फक्त श्वानप्रेमापोटी सुरु असलेली त्यांचे हे कार्य सुरू आहे.
नागपूरातील हजारीपहाड भागात त्यांनी भाडे तत्वावर जागा घेऊन सेल्टर उभारले आहे. त्यात सुमारे १५० पेक्षा अधिक कुत्रे आहेत. शिवाय स्मिता या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहचून जखमी झालेली, आजारी असलेल्या कुत्र्यांना वेळीच मदत देण्यासाठी आव्हान देखील करतात. अनेक वेळा त्या रात्री बेरात्री जखमी असलेले, अपघात झालेल्या कुत्र्यांना सेल्टर मध्ये आणावे लागते. मात्र, कोणत्याच मोबदल्याची अपेक्षा न बाळगता त्याचे हे कार्य सुरू आहे.
त्यांच्या या कार्यासाठी म्हणजे भटक्या कुत्र्यांवर होणारा एका महिन्याचा खर्च १ लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. शिवाय लॉकडाऊनमध्ये तो खर्च अधिकच वाढला आहे, असे मत स्मिता यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर कुत्र्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी लागणारा खर्च हा महिन्याकाठी ९ हजारांपर्यत आहेत. शिवाय सेल्टर मधील कुत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक सीसीटिव्ही देखील बसविण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे सेल्टरच्या भागात जाण्यासाठी रस्त्याचा असलेला अभावामुळे पावसाळ्यात त्यांची कसरत होते. मात्र, तरही स्वतःच्या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून स्मिता यांचे हे कार्य सुरू आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या परिणामामुळे मिरे यांचाही व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे त्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून पैसे गोळा करुन त्यांचे हे कार्य करत आहेत. त्यामुळे शासनाकडून ही 'थोडी का होईना' मदत मिळावी ही अपेक्षा स्मिता मिरे यांनी व्यक्त केली आहे. शिवाय नागरिकांनी देखील थोडी मानवता दाखून या भटक्या कुत्र्यांवरही इतर प्राण्याप्रमाणे प्रेम दाखवून माणूसकी जोपासावी, अशी भावनाही त्यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केली.