नागपूर- १३६ वर्ष जतन केलेली गौरवशाली परंपरा यावर्षी कोरोना महामारीमुळे खंडित होऊ नये म्हणून केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थिती काळ्या आणि पिवळ्या मारबतीचे दहन करण्यात आले. त्याआधी सभा मंडप ते दहन करण्याच्या ठिकाणापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. केवळ ५ लोकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने मारबतीचे पुजन करण्यात आले. त्यानंतर दहन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
पिवळ्या मारबतीचे ऐतिहासिक महत्त्व -
पिवळ्या मारबतीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तेली समाजाकडून १८८५ साली जागनाथ बुधवारीमध्ये पिवळी मारबत उत्सवाला सुरुवात करण्यात आली. हे वर्ष पिवळ्या मारबतीसाठी १३६ वे वर्ष ठरले आहे. इंग्रजांच्या विरोधात अनेक मुद्द्यांना घेऊन लोकांना एकत्रित आणत या मारबतीची मिरवणूक काढली जायची. स्वातंत्र्यनंतरच्या काळात या पिवळ्या मारबतीच्या मिरवणुकीच्या माध्यमातून अनिष्ट चालीरीती, इडा-पीडा यावर भाष्य होऊ लागले.
काळ्या मारबतीचे ऐतिहासिक महत्व
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या अत्याचारांनी जनता त्रस्त झाली होती. त्यावेळी नागपूरकर जनता इंग्रजांविरोधात संघर्ष करत असताना भोसले घराण्यातील बकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली होती. या बाकाबाईचा निषेध करण्यासाठी १८८१ पासून बकाबाईचा पुतळा तयार करून काळी मारबत काढण्यात येते. इतवारी परिसरातील नेहरू पुतळ्यापासून या काळ्या मारबतीच्या मिरवणुकीला सुरुवात होते. गेले १४० वर्ष ही मिरवणूक अव्याहतपणे सुरू आहे. यावर्षी कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग लक्षात घेता मारबतीचा कार्यक्रम व मिरवणूक काढण्यावर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंध घातला होता. त्यामुळे, परंपरेचे जतन म्हणून मोजक्या लोकांच्या उपस्थिती मारबतीचे दहन करण्यात आले.
हेही वाचा- बाजारपेठा बंद'ला व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद; मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट