नागपूर - कोरोना विषाणूच्या भीतीमुळे हजारो कामगारांनी आपल्या गावाकडे पलायन सुरू केले आहे. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेली कामगारांची धडपड आजही निरंतर सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव बघायला मिळत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ राज्याची सीमा लागलेली आहे. या दोन्ही राज्यांतून मोठ्या प्रमाणात बांधकाम आणि इतर कामातील मजूरवर्ग नागपूरसह विदर्भात कामाच्या शोधात येत असतो
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांतील हजारो कामगार विदर्भात कामासाठी येतात. सर्व गुण्यागोविंदाने सुरू असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या गरीब मजुरांच्या हातचे काम हिरावले गेले, ज्यामुळे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. सरकार, सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांकडून जेवणाची व्यवस्था केली जात आहे. मात्र, या दहशतीच्या वातावरणात आपला गावच बरा म्हणत हजारो कामगारांनी गेल्या अनेक वर्षांपासून सजवलेला आपला संसार मोडून बायको पोरांसह पायीच गावचा रस्ता धरला आहे.
या मजुरांमध्ये सर्वाधिक संख्या ही छिंदवाडा जिल्ह्यातील कामगारांची आहे. नागपुर ते छिंदवाडा जिल्ह्याचे अंतर सरासरी 150 किलोमीटर आहे.