नागपूर - ‘स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन’च्या कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर आज महिला आयोगाकडून व्हर्च्युवल सुनावणी करण्यात आली. यात दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आल्या. शिवाय याबाबतचा अहवाल महिला आयोगाकडून शासनापुढे लवकरच सादर करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
नागपूर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आयुक्त तुकाराम मुंढे असताना त्यांच्या विरोधात कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर यांनी महिला आयोगाकडे एक तक्रार दाखल केली होती. भानुप्रिया ठाकूर यांना त्यावेळी आयुक्तांनी मातृत्व रजा नाकारली होती. शिवाय मानसिक छळही केला, असा आरोप या तक्रारीतून करण्यात आला होता. त्यावर आज राष्ट्रीय महिला आयोगाकडून व्हर्च्युव्हली सुनावणी पार पडली.
या सुनावणीत आयुक्त तुकाराम मुंढे व भानुप्रिया ठाकूर यांनी आपआपल्या बाजू आयोगापुढे मांडल्या. त्यावर आयोगाकडून देखील दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आल्या.
आज सकाळी ११.३० वाजता सुनावणी पार पडली. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोग याबाबतचा अहवाल लवकरच शासनापुढे सादर करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. असे असले तरी तक्रारीबाबतचे किंबहुना या प्रकरणामधील कागदपत्रे भानुप्रिया ठाकूर यांच्या कडे महिला आयोगांनी मागितले असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील या तक्रारीबाबत महिला आयोग कोणता अहवाल शासनापुढे मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.